उस्मानाबाद - राज्यात शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी सर्वच विद्यार्ध्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील एक विद्यार्थ्यी सर्वच विषयात ३५ गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. रोहित सोनवणे, असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने अपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती.
शनिवारी जाहीर झालेल्या निकालात रोहितला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्वच विषयात ३५ गुण मिळाले आहेत. त्याची टक्केवारी काढल्यानंतर रोहितला ३५ टक्केच गुण मिळाले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील कांद्याचे कोठार म्हणून या अपसिंगा गावाची ओळख आहे. रोहितचे वडील रोहिदास सोनवणे हे शेतात पत्नीसह कुटुंबाची उपजीविका भागवितात. तर रोहितचा भाऊ आठवी तर बहीण सहावीचे शिक्षण घेत आहे. आई-वडिलांचे शिक्षण जेमतेम झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाप्रती म्हणावी तसी जागरुकता आई-वडिलांमध्ये दिसत नाही. रोहित हा आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करतो. त्यामुळे त्याने शाळा व शेतीचे गणित घालून मिळेल त्या वेळेत अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या निकालानंतर रोहितला पडलेल्या या गुणांची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.