उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरातील मंदिरे बंद करण्यात आली होती. ही मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आणि विविध संघटनांकडून मागणी होत आहे तशाच पद्धतीने तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे मंदिर देखील गेली काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळेच येथील लहान मोठ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत.
मंदिरावरती अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंदिरे सुरू होतील, अशी आशा होती मात्र मंदिर सध्या बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून सर्व नियम व अटी घालून मंदिरे लवकरात लवकर खुली करा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
मंदिर खुले करण्यासाठी भाजपचे आंदोलन
भाजप राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठीच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. त्याची सुरुवात तुळजापूर येथून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीपासून होणार असल्याचे भाजपकडून सांगितले आहे. यासाठी अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार असून भाजपने यापूर्वी देखील घंटा बजाव तसेच धरणे आंदोलन करत आपली मागणी रेटून धरली आहे. मात्र, आता भाजपबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गदेखील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी पुढे येत आहेत.