उस्मानाबाद - गर्भवती महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहारात अळ्या, किडे आणि चक्क उंदरांची विष्ठा (लेंड्या) सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांना हा आहार दिला जातो. सुकडी, उपमा, शिरा अशा पद्धतीने आहार दिला जात आहे. मात्र हा आहार एकदम निकृष्ट दर्जाचा असल्याचे पाहायला मिळत आहे.
बचत गटामार्फत पौष्टिक खाद्याची निर्मिती केली जाते तर अंगणवाडी सेविकांकडून हा आहार घरोघरी संबंधित महिलांना व लहान मुलांना दिला जातो. हा आहार निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याचा आरोप संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडेही काही महिलांनी केली. मात्र अद्याप यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचे अंगणवाडी सेविकेने सांगितले. यासंबंधी शहरात राहणाऱ्या शिलावती देशमुख यांनी महिला व बालकल्याण विभागात संपर्क साधला मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन हे असेच खाद्य देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून शिलावती देशमुख यांना सांगितले. या प्रकरणी ईटीव्ही भारतने संबंधित अंगणवाडी सेविका यांची प्रतिक्रिया मिळवली असून त्यांनीही या निकृष्ट दर्जाचा आहाराला दुजोरा दिला आहे. अशा तक्रारी आमच्याकडे आल्या मात्र आम्ही फक्त हे खाद्य वाटप करत असल्याचे सांगितले व यासंबंधी वरिष्ठांना तक्रारी करण्यात यावे अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारतला दिली.
महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला पौष्टिक आहार जनावरांसाठी -
शहरासह ग्रामीण भागातही पोष्टिक आहार अंगणवाडी मार्फत घरोघरी पोहोचवला जातो. काही ठिकाणी मूग डाळ, मसूर डाळ, गहू, मटकी असे पदार्थ दिले जातात, तर काही वेळेला सुकडी उपमा, शिरा असे पॅकिंग केलेले प्रॉडक्ट दिले जातात. मात्र बहुतांश वेळी असे पॅकिंग केलेले प्रॉडक्ट हे जनावरांना खाण्यासाठी दिले जात असल्याचे संबंधित महिलांकडून सांगितले जाते आहे.
निकृष्ट खाद्य पुरवणार्यांवरती कारवाई होणार का..?
जिल्ह्यात यापूर्वीदेखील पौष्टिक आहार निकृष्ट दर्जाचा पुरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, हे अद्यापही पुढे आलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.