उस्मानाबाद - साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात कवी कट्ट्याने झाली. या कवी संमेलनात कवींनी शेतकऱ्यांची व्यथा आणि सध्याची शासकीय व्यवस्था तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांवर कविता सादर केल्या. यावेळी सर्व कवींचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
या कवी संमेलनात चैत्राली जोगळेकर यांनी प्रत्येक वयोवृद्धात मला आपले बाबा दिसत असल्याचे सांगून घरात आणि समाजात वडिलांचे काय महत्त्व आहे हे पटवून दिले. घराला वृक्षाप्रमाणे सावली देणारा बाबा प्रत्येक घरात गरजेचा असतो. प्रत्येक वयोवृद्धात दिसतो एक बाबा म्हणत त्यांनी सर्वांना भावनिक केले. तर स्वप्नील कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांची व्यथा आपल्या कवितेतून मांडली.
हेही वाचा - ...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री!
निसर्गाची अवकृपा आणि शासकीय धोरणे कशी शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहेत याची अनेक उदाहरणे कवितांमधून दिली गेली. सोमेश कुलकर्णींनी जगाचा पोशिंदा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे गुणगान आपल्या कवितेतून केले. शासकीय धोरणे सर्वसामान्यांच्या जीवनात कसे अडथळे ठरत आहेत हे सांगितले. जगाचा पोशिंदा असलेल्या आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला कधी विसरू नये असे आवाहन केले. दरम्यान, कवी कट्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी संबंध मराठवाड्यातून कवी दाखल झाले होते. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या कट्ट्यामध्ये विविध अंगाने कविता मांडण्यात आल्या.