उस्मानाबाद - शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेऊनच माढामधील लोकसभेची उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच, सुशीलकुमार शिंदे यांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी सडकून टीका प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचा रविवारी उस्मानाबाद येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत भाजप सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.
सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर हे एमआयएमसोबत जाऊन राज्यघटना बदलण्याचे काम करत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आंबेडकरांनी शिंदे यांचे वय झाले आहे. यामुळे बुद्धी भ्रष्ट होते, विसरभोळेपणा वाढतो, अशी टीका त्यांनी केली. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना न्यूक्लिअर करारावेळी एमआयएमचे मत मागितले होते का नाही, असा सवाल त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवरही टीका करताना माढ्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीने केलेल्या सर्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीला जास्ती मते मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शरद पवारांनी घाबरून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
लोकसभेची लढाई सेना-भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या स्पर्धेतच नाही, असे आंबेडकर म्हणाले. शरद पवार यांच्या मते आम्ही भाजपची बी टिम आहे. असे असेल तर पवारांनी आमच्याकडे यावे आणि अकोल्यातून निवडणूक लढवावी. मी त्यांना खात्रीपूर्वक जिंकून देतो, असे म्हणत त्यांनी पवारांना चिमटा काढला.