उस्मानाबाद - जिल्ह्यातील अंगणवाडी शालेय पोषण आहारात जनावराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भूम तालुक्यातील अंतरगावमध्ये ही धक्कदायक घटना समोर आली आहे. या गावातील शाळेचा शालेय पोषण आहार ज्या खोलीमध्ये ठेवला आहे, त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याने त्या ठिकाणाची पालकांनी पाहणी केल्यानंतर तेथे मसूरीच्या डाळ पॅकेटमध्ये जनावराची विष्ठा आढळून आली.
संबंधित पालकांनी हा सगळा प्रकार येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर उजेडात आणला. तसेच या प्रकाराबद्दल जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली.
शालेय पोषण आहारात साप निघणे, पाल सापडणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र, आता याच पोषण आहारात चक्क जनावरांची विष्ठा निघाल्याने मुलांना पोषण आहार द्यावा की नाही? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आहारमध्ये विष्ठा आढळून येणे, हा गंभीर प्रकार असल्याने शासकीय अधिकारी व संबंधित विभागाने पोषण आहाराची पडताळणी करण्याची गरज आहे.