उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिरात बुट घालून गाभार्यापर्यंत गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे पायात बूट घालून थेट मंदिरातील होमकुंडापर्यंत गेले. यानंतर उपस्थित पुजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आक्षेप घेतला. अगदी मंदिराच्या गाभार्याजवळ बूट घालून गेल्यामुळे विलास दांडे या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजाभवानी मंदिरात सामान्य लोकांना मंदिराबाहेर चप्पल स्टँड उभे करण्यात आले आहे. तर मुख्य प्रवेश दारातून आत गेल्यावर पोलिसांसाठी एक पोलीस चौकी आहे. इथपर्यंत पोलीस बिनदिक्कतपणे बूट चप्पल घालून आतमध्ये प्रवेश करतात. मात्र, विलास दांडे यांनी तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडापर्यंत जाऊन रोष ओढवून घेतला आहे. मी अनावधानाने आतमध्ये गेलो असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास दांडे यांनी सांगितले. पुजाऱ्यांचा आणि भक्तांचा रोष लक्षात आल्यानंतर उपनिरीक्षक यांनी तत्काळ बूट पायातून काढून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांचे गाभाऱ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.