उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या पेठसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात देण्यात येणाऱ्या खिचडीत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Poisoning Students In Osmanabad) खिचडी खाल्ल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, सदरील प्रकारामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पालकांना घडलेला प्रकार सांगितला - सोमवारी सकाळी 9.30 वाजता शाळेतील पोषण आहार बनवणाऱ्या महिला आणि तिच्या पतीने नेहमीप्रमाणे खिचडी बनवून विद्यार्थ्यांना वाटप केली. (Zilla Parishad School at Pethsangvi) मुलांनी आपल्या घरी नेलेली खिचडी खात असताना एका मुलाच्या डब्ब्यात पालीचे मुंडके आढळले. तर, इतर विद्यार्थ्यांच्या डब्ब्यात पाय आणि अन्य अवयव आढळले. मुलांनी तात्काळ आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.
खिचडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटदुखी - पेठसांगवी येथील शाळेत एकूण 250 पेक्षा जास्त पटसंख्या आहे. त्यापैकी काही मुलांना उलटी आणि पोटदुःखीचा त्रास सुरू झाला. खिचडी खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय आल्याने सरपंच, उपसरपंच आणि शिक्षकांनी शेजारील गावावरून डॉक्टरांना पाचारण केले. शाळेतील एकूण 240 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 23 जणांना विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाले आहे.
विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती उत्तम - एकूण 23 जणांना तातडीने उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान उमरगाचे आमदार यांनी घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली. पोटदुखी, मळमळ, उलट्याचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 तास निगराणीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य