उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. आज (दि. 14 सप्टें.) मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
चार वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथून शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या हक्काच्या मागणीसाठीचे मोर्चे निघाले होते. या मोर्चानंतर गेले दोन वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करून मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, हे आरक्षण अचानक रद्द करणे म्हणजे मराठा समाजात जेवणास वाढलेले ताट मधूनच हिसकावून घेण्याचा प्रकार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर सध्या कोरोनाच्या गंभीर स्थिती तसेच चीन व पाकिस्तान यात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मराठा समाज संयम ठेऊन आहे. हा संयम सुटण्यापूर्वी मराठा समाज आक्रमक होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा - तुळजाभवानीच्या मौल्यवान दागिन्यांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश