उस्मानाबाद - जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून प्राण्यांना पिण्याची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भटकंती दरम्यान त्यांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. लोहारा भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर पिण्याच्या पाण्याच्या शोधामध्ये आलेल्या एका मोराचा पाण्याअभावी मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाच्या पाऱ्यामध्ये वाढ होत आहे. सद्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. या तापमानात जिल्ह्यातील तलाव, नाले यामध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. यामुळे प्राण्यांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोहारा भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरात पाण्याच्या शोधामध्ये आलेल्या एका मोराचा पाण्याअभावी मृत्यू झाला. उष्माघात झाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बातमी कळताच शहरातील प्राणीमित्र श्रीनिवास माळी यांनी वन विभागाशी संपर्क साधून मृत मोराला वन विभागाच्या स्वाधीन केले. पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेने प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.