उस्मानाबाद- महाराष्ट्रात उस्मानाबादी शेळीला प्रचंड मागणी आहे. जिल्हा दुष्काळी असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. असाच शेळी पालनाचा व्यवसाय उमरगा तालुक्यासह इमामसाहेब माळ या गावातील शेतकरी मुजावर इमाम हे करतात. या शेळी पालनातून त्यांना एक लॉटरीच लागली आहे. त्यांच्याकडे असलेल्या एका बोकडाला तब्बल १० लाख रुपयांची बोली लागली आहे. बकरी ईद निमित्त अनेक व्यापाऱ्यांनी या बोकडाची मागणी केली आहे.
मुजावर इमाम हे गेली 25 वर्षांपासून शेळी पालन करत आहेत. साधारणपणे दीड वर्षापूर्वी त्यांच्या बकरीला दोन पिल्ले झाली. यातील एका पिल्ल्याचे नाव त्यांनी सोन्या असे ठेवले होते, याच सोन्याच्या डोक्यावर चंद्र तर मानेखाली आलिफ आहे. मुस्लीम धर्मात बकरी ईदला बळी देण्यासाठी डोक्यावर चंद्र व आलिफ असलेला बकऱ्याला मोठे महत्त्व व मागणी असते. याची माहिती असल्याने इमाम यांनी सोन्याचा चांगला सांभाळ केला. त्याच्या दिमतीला एक माणुस सतत सेवेत असतो. सोन्याला रोज नियमित पौष्टिक खुराक दिला जातोय. यामुळे चांगलेच वजनही वाढले आहे. सध्या त्यांच्या सोन्याचे वजन सध्या ६५ किलो आहे.
सोन्या विक्री करण्यास योग्य झाला होता. त्यामुळे बकरी ईदला विक्री करण्याच्या हेतूने इमाम यांनी मुजावर यांनी फेसबुक व व्हॉटसअपच्या माध्यमातून सोन्या बोकडाची माहिती आणि फोटो व्हायरल केला. त्या माहितीनुसार गुलबर्गा व मुंबईच्या व्यापाऱ्यांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी सोन्या बोकडाची मागणी केली. सोन्याचा रुबाब ही तसा भारीच आहे. खरेदी करणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या सोन्याची बोली तब्बल १० लाखांवर पोहोचली आहे. सोन्याला एवढी मोठी बोली लागल्यामुळे इमाम मुजावर हे शेतकरीही आनंदी आहेत. त्यामुळे सोन्याच्या मालकाला मुजावर इमाम यांना सोन्याचे दिवस आले आहेत.