उस्मानाबाद - लोकसभेचे रणशिंग फुंकले आणि एकमेकांच्या विरोधात भाऊबंदकी उभी राहिली, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धक असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील प्रचार आता टोकाच्या पलीकडे जाताना दिसून येत आहे.
आचारसंहितेच्या सूचनांची नियमावली शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटाकडून ओलांडली गेल्याचे दिसून येत आहे. एकमेकांच्या विरोधात कार्टूनवार करून एकदम खालच्या पातळीवरती जाऊन टीकाटिप्पणी दोन्ही बाजूंनी होत आहे. कार्टूनवारमध्ये पाटील घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा उल्लेख करून राणा पाटील पैशाची गाठोडे पाठीवरती घेऊन स्विस बँकेत जात आहेत आणि हा मार्ग शरद पवार दाखवत आहेत, अशी कार्टून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजेनिंबाळकर घराण्यावरती दूधवाला ते भंगारचोर, अशी वैयक्तिक टीका केली जात आहे. यामुळे भविष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेल्या या चुकीच्या प्रचाराला अनुचित वळण लागण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता अशी वैयक्तिक टीका करणे हे आचारसंहिताभंगाचा गुन्हा आहे. मात्र, अशा गंभीर गुन्हाकडे आचारसंहिता विभागप्रमुखांचे दुर्लक्ष आहे.
कार्टूनवार संबंधी आचारसंहिता विभाग प्रमुख संजय कोलते यांच्याकडे चौकशी केली असता मी कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. २ उमेदवार एकमेकांवर आरोप करून प्रचाराची ताकद वापरून लक्ष दोघांकडे वळवत आहेत. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष देणार की नाही? आणि भावकीतील या सत्ता संघर्षामुळे भविष्यात या कार्टूनवारने अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.