उस्मानाबाद: दुष्काळी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातल्या डोंजा गावातील तांबे कुटुंबीयांची ही कहाणी आहे. एकेकाळी रोजगारासाठी डोंजा गाव सोडलेले तांबे हे पुणे येथील उरुळी कांचन येथील नर्सरी मध्ये रोजगारासाठी काम करत होते. तिथे त्यांना नर्सरीमध्ये काम करण्याची कला अवगत झाली. आपलाही स्वतःचा व्यवसाय असावा, आपणही लोकांना चार पैसे रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी भावना मनी बाळगून ते गावी आले. 2010 साली त्यांनी दीड एकर शेतामध्ये बोर्ड, दिवाईड, सोफीया, काश्मिरी, तोडीगंडा, बोरोंडो, पॉपलर, मिनीक्युअर, बटनगुलाब, रेड आय अशा सातशे प्रकारचे सहा हजार पाचशे गुलाबाची (rose farming) रोपे लावली.
खरंतर परांडा तालुक्यातील आडमार्गे असलेल्या, जवळ कोणतीही मोठी बाजारपेठ नसलेल्या डोंजा गावातील माळरान जमिनीवर गुलाब शेती करणं म्हणजे चॅलेंजच होतं. परंतु कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सुरुवातीला दिड एकर गुलाब लावला. या गुलाब शेतीतून लाखो रुपये कमावले. डोंजा गावातील पांडुरंग तांबे व कल्पना तांबे या दाम्पत्याची गुलाबाच्या फुल शेती आणि रोपांच्या विक्रीतून वार्षिक आठ लाखांची उलाढाल होते. तर त्यांनी पुणे आणि औरंगाबादच्या कंपनीशी 18 लाख रुपयांचा करार (contract farming) देखील केला आहे.
मुंबईसह राज्याबाहेर देखील ते गुलाब फुलांची विक्री करतात. सुरुवातीच्या काळात फूल शेती करताना संघर्षाचा सामनाही करावा लागला. परंतु, आता गुलाब शेतीच्या जीवावर त्यांनी संसाराचा मळा फुलवला आहे. लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. आता तांबे कुटुंबियांकडे पाच एकर गुलाब शेती आहे. तर त्यामध्ये 700 प्रकारचे गुलाबाची त्यांनी लागवड केली आहे. तर त्यामध्ये 6500 गुलाबाची रोपे आहेत. तर ते आता पाच महिलांना दररोज अडीचशे रुपये रोजाने रोजगार उपलब्ध करून देतात. रोजगार प्राप्तीसाठी बाहेर गेलेल्या तांबे कुटुंबियांनी गावातच रोजगार उपलब्ध करून दिला आहे. खरंतर जिद्द आणी चिकाटीला संघर्षाची जोड मिळाली की यशस्वी होता येतं, रोजगार मागणाराही रोजगार उपलब्ध करून देवु शकतो, माळरानावरही शेतीतुन लाखो रुपयांचे उत्पन्न कमावु शकतो हेच यावरून सिद्ध होतं.