उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवार प्रचारासाठी जोर धरत आहेत. युतीचे आणि आघाडीचे गोडवे राज्यात गायले जात असले तरी जिल्ह्यात आघाडी आणि युतीमध्ये कटुता पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत.
हेही वाचा - ..तर शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ; उस्मानाबादेत भाजपाध्यक्षाचा इशारा
राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. याचा फायदा घेत भाजपचे सुरेश पाटील यांनी उमेदवारीच्या आशेने शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांची निराशा झाली आणि संजय निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत दंड थोपटले. तर शिवसेनेत उस्मानाबाद-कळंब या मतदारसंघासाठी कैलास पाटील यांना उमेदवारी दिल्याने अजित पिंगळे या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज भरला.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी ही बंडखोरी नक्कीच डोकेदुखी ठरणार असली तरी मित्रपक्षासोबतची मैत्री कामाला येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये सेना-भाजपाच्या मेगा भरती नंतर आता बंडखोरांची मेगा गळती
शिवसेना-भाजपत अजूनही मनोमिलन झाले नाही. राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे राणा पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना रस्त्यावर उतरलेली दिसत नाही. त्यामुळे भाजपने देखील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटीलांच्या प्रचारापासून चार हात लांब राहणे पसंत केल्याचे चित्र आहे. जी अवस्था भाजप-सेनेची आहे तशीच भांडणे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, या दोन्ही पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अजित पिंगळे आणि सुरेश पाटील हे मात्र गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत.