उस्मानाबाद - लोहारा शहरात एका झेरॉक्स सेंटर चालकाला ऑनलाइन गंडा घातला आहे. ग्राहक सेवा केंद्र देण्याचे आमिष दाखवून झेरॉक्स सेंटर चालक पुष्कराज चौधरी याला अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने सुमारे 75 हजार 800 रुपयांना चुना लावला असून या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील तहसील कार्यालयात चौधरी यांचे वैभव झेरॉक्सचे दुकान आहे. 19 ऑक्टोबर रोजी आपल्याच दुकानात बसून इंटरनेट सर्फिंग करीत असताना त्यांनी एका वेबसाइटवर जावून कस्टमर सर्व्हिस पॉइंट मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. काही क्षणातच त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरील अज्ञात व्यक्तीने "मी बँक मित्र सर्व्हिस कंपनीमधून बोलतोय, असे सांगत तुम्हाला आमच्या कंपनीची सेवा हवी असल्यास संगणक तसेच सॉफ्टवेअरचे 15 हजार 800 भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर व्हॉटसअपवरून बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक अज्ञात व्यक्तीने दिला. त्यानंतर दोनतीन वेळा याच अज्ञात व्यक्तीचा वेगवेगळ्या फोन नंबरवरून फोन आला आणि पैश्याची मागणी केली. त्याप्रमाणेच यूपीआय अॅपद्वारे 75 हजार 800 रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर थोड्या दिवसांनी समोरील व्यक्तीने फोन करून अजून 45 हजार रुपये मागितले. त्यानंतर मात्र चौधरी यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला व समोरच्या व्यक्तीला फोन करुन विचारपूस केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोहारा पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.