उस्मानाबाद - यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचा हप्ता ऑनलाईन भरताना अनेक गावातील गटक्रमांक जूळत नाहीत. अशात गावातील शेतकरी पिकविमा हप्ता भरण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत पिकविमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.
ऑनलाईन पिकविमा भरतेवेळी सातबारा उतारा व गटक्रमांक जुळत नसल्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे, जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी रब्बी पिकविमा भरण्यापासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे. पिकविमा भरण्यास काही अवधी शिल्लक राहिलाय, मात्र अद्याप ही बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत. नेट कॅफेमध्ये शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे शासनाने पिकविमा ऑनलाईन भरण्याची मूदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होत आहे.