उस्मानाबाद - लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाला.
या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर तर आघाडीकडून राणा जगजितसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ओमराजे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी या मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजता जाऊन मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगजितसिंह पाटील यांनीही उस्मानाबाद तालुक्यातील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राणा जगजितसिंह यांच्यासह माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनी देखील मतदान केले. दरम्यान, मतदानानंतर पाटील यांनी जिल्ह्यातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
ओमराजे निबांळकर यांनी मतदानानंतर बोलताना प्रतिस्पर्धी उमेदवार पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. मतदार सुज्ञ असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.