उस्मानाबाद - जिल्ह्यात येथून पुढे दर शनिवारी जनता कर्फ्यू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र तुर्तास तरी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले आहे. सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढत असून आपण लॉकडाऊन करणार नाहीत. मात्र, जमावबंदी आणि जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
हेही वाचा - 'पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, दिशाभूल केल्यास कडक कारवाई'
उस्मानाबादेत प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू लागू करणार असून जमावबंदी आणि जनता कर्फ्यूमध्ये दंडात्मक कारवाई वर भर असणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही कडेकोट बंदोबस्त ठेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरीक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आर. व्ही. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी यावेळी उपस्थित होते