उस्मानाबाद - दिवसेंदिवस कोरोना रुग्ण हे वाढत आहेत. बुधवारी (दि. 14 एप्रिल) उस्मानाबाद जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला. एकाच दिवशी 613 नवे रुग्ण आढळून आले तर 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अवघ्या काही तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्याती 5 हजार 156 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी मृत्यू झालेल्यांपैकी 3 रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात भरती केल्यानंतर 24 तासांच्या आत तर 6 जणांचा मृत्यू 48 तासानंतर व 5 जणांचा मृत्यू हा 72 तासानंतर झाला होता. त्यामुळे नागरिकांनी आजार अंगावर न काढता लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. एकिकडे ग्रामीण भागातही लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे.
आतापर्यंत 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील 5 हजार 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत 657 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 388 रुग्ण आढळून आले आहे. मात्र, बुधवारी एकाच स्मशानभूमीत 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने कोरोनाने धडकी भरवणारी घटना उस्माबादेत घडली आहे.
हेही वाचा - टाळेबंदीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सलून व्यावसायिकाची विष प्राशन करून आत्महत्या