उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज उस्मानाबाद शहरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन केले. केंद्र सरकार सामान्य लोकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे हे आंदोलन आम्ही करत असून 'एक ही भूल कमल का फूल' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल पंपावर गुलाबाचे फुल वाटप करत निषेध व्यक्त केला. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्या लोकांना, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना आणि पेट्रोल पंप चालकांना गुलाबाचे फुल देऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. आज पेट्रोलचा दर 87.76 आहे, तर डिझेल दर 78.20 रुपये आहे. हा दर सामान्यांना परवडणारा नाही. भाजप लोकांची फसवणूक करत असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आहेत. मात्र तरी लोकांची लूट केली जात असल्याचा आरोप करत पेट्रोल, डिझेलचे भाव लवकरात लवकर कमी करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.