उस्मानाबाद - राज्यभरात राष्ट्रवादीचे मातब्बर नेते भाजपमध्ये जात असताना उस्मानाबादमध्येही पक्षाला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंह यांनी वडील माजी खासदार पद्मसिंह यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राणा जगजित सिंह यांनी 'मला तुमच्याशी काही बोलायचयं' या आशयाची टॅगलाईन घेऊन परिवार संवादाचे आयोजन केले. यावेळी बोलताना राणा जगजित सिंह म्हणाले, हक्काचे पाणी, सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांना न्याय व तरुणांना रोजगार द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपले सामर्थ्य वाढवायचे आहे. सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, असे सांगत त्यांनी पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा केली. या परिवार संवाद सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले माजी गृहमंत्री व माजी पाटबंधारेमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे यावेळी उपस्थित होते. पद्मसिंह पाटील यांनीही राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत शुभेच्छाही दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे उस्मानाबादमध्ये आगमन झाल्यानंतर राणा जगजित सिंह यांनी त्याकडे पाठ फिरविली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
हेही वाचा-सहकारी बँक घोटाळा.. शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत दाखल
राज्यातील राजकारणाला मिळणार मोठी कलाटणी-
राज्यात राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पक्षात घेतले आहेत. आता तर थेट शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन मोठा धक्का दिला आहे. पाटील पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला नाहीतर संपूर्ण राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. पवारांचे अत्यंत विश्वासू व जवळचे नातेवाईक म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख आहे. पण, आता हेच पाटील कुटुंबीय पवारांची साथ सोडणार असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती.
हेही वाचा-उस्मानाबादमध्येही बालहट्ट पुरवला जाईल?; पद्मसिंह, राणा जगजितसिंह पिता-पुत्रांचा नंबर
यापूर्वी भाजपने राणा जगजितसिंह पाटील यांच्या चुलत बहिणीला दिली होती उमेदवारी-
भाजपने पवार यांचे नातेवाईक व राणा जगजितसिंह पाटील यांची चुलत बहीण कांचन कुल यांना पक्ष प्रवेश दिला होता. त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा उमेदवारी देऊन तगडी लढत दिली होती. आता तर पद्मसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजप काय रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाही, तर पुतणे अवधूत शिवसेनेच्या वाटेवर