उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज दुपारी घटस्थापना करून नवरात्रौत्सवाची सुरुवात करण्यात आली. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना तुळजाभवानीच्या मंदिरात घटस्थापना झाली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नी पूजा व धार्मिक विधीकरून मंदिरात घटस्थापना केली. यावेळी मंदिरातील पुजारी, महंत, सेवेकरी आणि पुरोहित उपस्थित होते.
नवरात्रीमुळे तुळजाभवानीचे सिंहासन आकर्षक रंगाच्या फुलांनी सजवण्यात आले. देवीच्या गाभाऱ्यात गहू, तांदूळ, ज्वारी, जवसासह इतर पिकांचे बियाणे काळ्या मातीत टाकून घटाची स्थापना करण्यात आली. 9 ऑक्टोबरपासून आज पहाटेपर्यंत देवी पलंगावर मंचकी निद्रेत होती. पहाटे पलंगावरून सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 नंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली.
दरवर्षी नवरात्रौत्सवासाठी राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून भाविका पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे भक्तांना तुळजापूर शहरात प्रवेश नाही. तर शहरातील भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी भाविकांविनाच नवरात्र साजरी होत आहे.