उस्मानाबाद- नुकतेच जन्मलेले नवजात अर्भक एका निर्दयी मातेने पिशवीत ठेऊन पळ काढल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तुळजापूर तालुक्यात उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाभळगाव तलावाजवळ हे अर्भक आढळून आले.
बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास टोल नाका येथे पेट्रोलिंग करत असताना बालाजी हिप्परगे यांना बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी हा आवाज कुठून येतोय याचा शोध घेतला असता, एका पिशवीतून हा आवाज येत असल्याचे त्यांना समजले. कुतुहलाने पिशवी उघडून पाहिली असता, त्यांना जिवाच्या आकांताने रडणारे हे अर्भक दिसून आले.
हेही वाचा-'अकार्यक्षम, कामचुकार अधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला लाज वाटते'
याबाबत त्यांनी तात्काळ नळदुर्ग पोलीस ठाण्यात माहिती दिली. काही वेळातच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, बाळाला पिशवीतून बाहेर काढले. यावेळी जखमी अवस्थेतील बाळ भुकेने रडत होते. या रडणाऱ्या बाळाला बघून महिला पोलीस कर्मचारी सुवर्णा गिरी यांचे मातृत्व जागे झाले. यावेळी त्यांनी स्वःताचे दूध या बाळाची भूक शमवली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या बाळाचे प्राण वाचल्याची चर्चा आता कर्मचारी करत आहेत. बाळाला उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.