उस्मानाबाद - वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे एका शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करत वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण केले आहे.
यासाठी शेतकऱ्याने भुईमूगाच्या पिकात लोखंडी पाइप, पंखा, सायकलचे अॅक्सल आदी साहित्याचा वापर करून बुजगावणं बनवलंय. याचा चंगलाच फायदा होत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आलं.
सांगवी शिवारात अशोक मगर यांचे माळरान आहे. या ठिकाणी दोन एकरात त्यांनी भुईमूगाचे पीक घेतले आहे. मात्र, रात्री हरीण, रानडुक्कर, आदी वन्यप्राणी पिकात घुसून नुकसान करत असल्याने त्यांनी यावर उपाय शोधला. यातून आगळंवेगळं बुजगावणं साकारण्यात आलंय.
शेंगाच्या पिकात लोखंडी पाइप रोवून त्यावर टेबल फॅनचा पंखा सायकलच्या अॅक्सलवर बसवला आहे. त्यास सायकलच्या बेअरिंगची जोड दिली असून, खालच्या बाजूस स्टीलचे ताट बसवले आहे. वाऱ्याच्या प्रवाहाने पंखा फिरल्यानंतर मागील बाजूस बसवलेले दोन नट ताटावर आदळून आवाज येत असल्याने पिकात शिरलेले वन्यप्राणी पळून जातात. त्यामुळे भुईमूगाचे संरक्षण होण्यात हातभार लागत आहे.