उस्मानाबाद - मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष डॉ. ए.एम. देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना व्हायरस संदर्भात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
14 दिवसानंतर या आजाराचे परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे 14 दिवसच पूर्णपणे कर्फ्यू लागू केल्यानंतरच कोरोनाची लागण कोणाला झाली हे समजेल व कर्फ्यू असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात राहील. त्यामुळे ही कोरोनाची पसरत चाललेली साखळी तुटेल, असे या पत्रात नमूद केले आहे. जर आपण 14 दिवसांचा कर्फ्यू लागू केला नाही तर, एप्रिल मेच्या दरम्यान आपल्या देशातील सर्व रुग्णालये पूर्णपणे भरलेले असतील आणि चीन, इराक, इटली पेक्षाही अतिभयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत ए. एम. देशमुख यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना व्यक्त केले. त्यामुळे जर हे टाळायचे असेल तर आताच कठोर पावले उचलून 14 दिवसांचा कर्फ्यू लावणे गरजेचे असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे.