उस्मानाबाद - लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. आपले लग्न कायम लक्षात राहावे, यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात. उस्मानाबादपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरे येथे असेच हटक्या पद्धतीने लग्न झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे चक्क जनावरांच्या चारा छावणीत लग्न केले आहे. सतीश सोमण यांच्या पुढाकाराने हा लग्न सोहळा पार पडला.
जनावरांच्या चारा छावणीत मंडप आणि लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न या चारा छावणीत पार पडत आहेत. लग्नासाठी बँड-बाजा, जेवण, स्टेज, वऱ्हाडी मंडळी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी याच छावणीत करण्यात आली होती.
सध्या मराठवाड्यासह विदर्भातल्या काही भागांमध्ये भयाण दुष्काळ आहे. या दुष्काळाने घरातील मुलींची लग्न होत नसल्याने, अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, अशी घरच्यांची इच्छा असते. मात्र, दुष्काळामुळे अतिशय थाटामाटात लग्न करणे अशक्य झाले आहे. सतीश सोमण यांनी मोडीत निघालेली दोन लग्न जुळवली. आज त्यांनी दोन्ही लग्न चारा छावणीत लावून दिली. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी चारा छावणीत लावण्यात आलेले लग्न हा महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग असेल.
मोठा खर्च करून करण्यात येत असलेल्या लग्नाला फाटा देत कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न व्हायला पाहिजेत. गावात प्रतिष्ठा राखण्यासाठी अगदी कर्ज काढूनही लग्न केली जातात. मात्र, या चारा छावणीत केलेले हे लग्न महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते.