उस्मानाबाद - गेली आठ दिवस झाले संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसभर ढग दाटून येतात मात्र म्हणावा तसा वरून राजा बरसत नाही. पावसाची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत.
जून अखेरला झालेल्या पावसावर जिल्ह्यातील काही मंडळात २ लाख ५४ हजार हेक्टरवर सोयाबीन, उडीद यांसह इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र,पावसाने दडी दिल्याने हलक्या जमिनीवरील पीके करपू लागली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीसुद्धा पिकाचे दोन्ही हंगाम पाऊस नसल्याने वाया गेले होते. यंदाच्या उत्पन्नातून गेल्या वर्षीची तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीची खते वापरून पेरणी केली आहे. मात्र, सध्या पावसाअभावी पीक सुकू लागल्याने शेतकरी वर्ग आशा गमावत आहे. काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही खरीप पेरणी केलेली नाही.