उस्मानाबाद - जिल्ह्यात आजही पारंपरिक पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात काही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातही उत्पादन वाढीपेक्षा नुकसानीचाच त्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटासोबत कोरोनाच्या या महासंकटामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
एक टरबूज 6 ते 7 किलो -
भाऊसाहेब गायकवाड यांना देवळाली शिवारात 21 एकर क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी गतवर्षी 3 एकरात दोडक्याची लागवड केली. मात्र, लॉकडाऊनमुळे दोडके हे वेलालाच वाळून गेले. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात भाऊसाहेब आणि त्यांचे बंधू नानासाहेब गायकवाड यांनी तब्बल 5 एकरात टरबूज पिकाची लागवड केली. फवारणी, मशागत आणि औषधसाठी गेल्या चार महिन्यात 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. अविरत परिश्रमाच्या जोरावर एक नग 6 ते 7 किलोचा झाला होता. किमान 3 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला तरी 3 लाखाचे उत्पादन होईल, असा आशावाद होता. मात्र, काढणीच्या प्रसंगी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या फडावर व्यापारीच फिरकले नाहीत. शिवाय सर्व बाजारपेठा बंद असल्याने विक्री कुठे करावी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणाप्रमाणे या सरकारने ओबीसीची वाट लावली - चित्रा वाघ
टरबूज जनावरांच्या दावणीला -
डेरेदार टरबूज आजही शेतात पडून आहेत. आता खरीपासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या दृष्टीने वावरात पडलेली टरबूज आता जनावरांच्या दावणीवर जात आहेत. भरघोस उत्पादनाऐवजी आता शेतातील टरबूज बाहेर काढण्यासाठी गायकवाड यांना 15 हजाराचा खर्च आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे या नुकसानीकडे लक्ष तरी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुकट टरबूज घेऊन जाण्याचे आवाहन -
वेळेत टरबूज बाजारात दाखल झाले नाहीत. त्यामुळे जागेवरच सडत आहेत. नागरिकांनी टरबूज फुकटात घेऊन जाण्याचे आवाहन भाऊसाहेब गायकवाड यांनी केले आहे. मात्र, गावात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि निर्माण झालेले वातावरण यामुळे फुकटही कोणी घेऊन जाण्यास धजत नाही.
खर्च टाळण्यासाठी अख्ख कुटुंब राबतंय -
उत्पादन नाही किमान काढणीला अधिकचा खर्च होऊ नये, म्हणून गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्य हे टरबूजाच्या फडात राबले. टरबूजाची जोपासना करण्यात जे हात राबत होते त्याच हातांनी आज हे टरबूज बांधावर आणि जनावरांच्या दावणीवर टाकण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.
हेही वाचा - पंढरपूरच्या प्राध्यापकाची चक्क शरद पवारांवर पीएचडी