उस्मानाबाद - तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान- मोठी धरणे जेमतेम भरली आहेत. नदी-नाले मात्र तुडुंब भरून वाहत आहेत. भूम तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद तुळजापूर तालुक्यामध्ये झाली आहे.
आजही जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात पाझर तलाव, साठवण तलाव आणि लहान- मोठी 223 धरणे आहेत. यातील बहुतांश धरणात 38 ते 40 टक्के पर्यंत पाणी साठा उपलब्ध झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.
सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कळंब तालुक्यासह इतर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस आणि सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला आहे. सध्या सोयाबीन काढणीच्या दिवसाला सुरुवात होण्याची वेळ आहे. मात्र, अचानक आलेल्या तुफान पावसामुळे ऊस पडला आहे आणि सोयाबीन भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळते आहे.
हेही वाचा-'बेरोजगारी हा राजकीय मुद्दा नाही, तर मानवतावादी विषय'