उस्मानाबाद - रस्त्यावर हातचलाखीचे खेळ करणाऱ्या व्यक्तीने एका शाळकरी मुलाचे जादू शिकवतो, अशी फूस लावून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. संकेत अशोक शेळके (वय 13) असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या मुलाची सुखरूप सुटका केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - उमरगा तालुक्यातील रामपूर येथे आढळला 9 लाख रुपयांचा गांजा
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की कळंब येथून एका जादूगाराने संकेतला जादूचे खेळ शिकवतो, अशी फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर जवळपास 5-6 दिवस या मुलाला शोधण्याचे काम सुरू होते. यासंबंधी सोशल मीडियावर हा मुलगा हरवल्याचा मेसेज फॉरवर्ड करण्यात आला होता. त्यानंतर हा मुलगा एका व्यक्तीला आढळला तेव्हा या व्यक्तीने मेसेजमधील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला. त्यानंतर बारामती पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी बारामती तालुक्यातील लिमटेक या गावात जाऊन या मुलाला आरोपीच्या तावडीतून सोडवले. महादेव जनार्दन टिंगरे, असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.