उस्मानाबाद - बजाज अलायन्स या विमा कंपनीने शेतकऱ्यांना चक्क इंग्रजीमध्ये पत्र पाठवून तुम्ही विमा मिळवण्यास अपात्र असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अशी पत्र इंग्रजीमध्ये पाठवण्यात आली आहेत.
72 तासाच्या मर्यादेचे पत्र
या पत्रात म्हटले आहे, की पिकांचा फक्त विमा उतरून फायदा नाही, पावसामुळे नुकसान झाले असले तरी 72 तासांत याविषयी कंपनीला माहिती दिली नाही. त्यामुळे तुम्ही विमा मिळण्यासाठी अपात्र आहेत, असे सांगून अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने 72 तासाच्या मर्यादेचे पत्र पाठवून संकटात ढकलले आहे. जिल्ह्यात मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके मातीसह वाहून गेली. तर काही ठिकाणी शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने पीक जळून आणि बुरशी रोगांना बळी पडले. परिणामी उत्पादनात घट झाली आहे.
केंद्रीय पथकाने केली पाहणी
हा पाऊस पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी दौरे करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विमा कंपनीने शेतकऱ्यांना असे पात्र पाठवून संकटात ढकलले आहे. केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी पाहणी केली. यादरम्यान पथकासमोर शेतकऱ्यांनी संबंधित पत्राचा दाखल देत कंपनीने शेतकऱ्यांना घातलेल्या नियम आणि अटींचा पाढा वाचला आहे. त्यामुळे केंद्रीय पथक आणि राज्यसरकार हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कसा दिलासा देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.