उस्मानाबाद - चुकीच्या पद्धतीने उपचार करून घेणं एका पेशंटला चांगलंच महागात पडलं आहे. एका दाताच्या डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने पेशंटचे सर्व दात पडले आहेत. आता हा रुग्ण चांगलाच संतापलाय; आणि त्याने कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलय. डॉक्टरांवर तसेच त्यांचा बचाव करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्याने केली आहे.
भूम तालुक्यातील रहिवासी परमेश्वर लोखंडे हे गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गमावलेल्या दातांसाठी न्याय मागत आहेत. यासाठी त्यांनी उपोषण देखील सुरू केलय. डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे लोखंडे यांना मोठी किंमत फेडावी लागली आहे.
ऐका तर किस्सा...
परमेश्वर लोखंडे चिंचोली येथील डॉ. अमोल कुटे व पत्नी डॉ. सुचिता कुटे यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. यावेळी डॉक्टरांनी भूल देऊन दुखणारा दात काढण्याऐवजी दुसरा दात काढला. तसेच उपचारादरम्यान देण्यात आलेल्या इंजेक्शनचा परिणाम होऊन तोंडातील सर्व दात हालू लागले. यामुळे उर्वरित सर्व दात काढून टाकण्यात आले. दात काढल्यानंतर डॉक्टरांनी कवळी बसवून घेण्याचा सल्ला दिला; आणि लोखंडे यांच्याकडून त्यासाठी पैसे घेतले. यानंतर त्यांना कवळी बसवण्यात आली. मात्र, नंतर कवळीही बसत नव्हती. तसेच जेवताना व बोलतानाही त्यांना त्रास होऊ लागला. आता व्यवस्थित चिकित्सा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यानंतर पैसे डॉक्टरांनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचे ते म्हणाले. आता डॉक्टर दाम्पत्य तसेच त्यांचा बचाव करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ते आंदोलनाला बसले आहेत. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे परमेश्वर लोखंडे यांनी सांगितले.