उस्मानाबाद - विधानसभेबाबत मी नक्कीच विचार करेन, मी सर्वांच्या मताचा आदर करतो. मात्र, सध्या दुष्काळ महत्त्वाचा असून त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करू, असे वक्तव्य युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते रविवारपासून जिल्हा दुष्काळी दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचा ७ महिन्यात जिल्ह्यातील दुसरा दुष्काळी दौरा आहे.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी चारा छावण्यांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना तुमच्या सदैव पाठीशी असून कुठलेही राजकारण न करता आम्ही तुमच्या सोबत राहू, तुमच्या संकटात तुम्ही आम्हाला हाक मारा आमचा प्रत्येक शिवसैनिक तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन आदित्य यांनी दिले. कुणीही वाईट विचार करू नका, तुमची काळजी आम्हला आहे. जनावरांची काळजी घेतली जाईल, त्याच बरोबर तुमच्या सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करत आहोत. या दुष्काळाला हद्दपार करण्याचा प्रयत्न करू, शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. चारा छावण्यावरती असलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप सुरू आहे, यावेळी आदित्य ठाकरे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना विधानसभेबाबत मी नक्कीच विचार करेन, मी सर्वांच्या मताचा आदर करतो, असे सांगत आता सध्या दुष्काळ महत्त्वाचा असून त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करू असे सांगितले.