उस्मानाबाद - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या संकटाच्या काळात प्रत्येकांना वेगवेगळे अनुभव मिळत आहेत. जवळची वाटणारी नाती परकी होत असल्याचेही अनुभव लोकांना आलेत, तर कुठलाही स्वार्थ न ठेवता ओळखीचे नसणारे नवीन चेहरे मदतीचा हात पुढे करत आहेत. अशीच एक घटना उमरगा तालुक्यात घडली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. सदर महिला मुंबई येथून आली होती. या महिलेला दोन लहान मुलं आहेत, तर याच महिलेचा पती काही दिवसांपूर्वी मृत झाला आहे. त्यामुळे दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर आली. मात्र, सासरच्या मंडळींनी हात वर केल्यामुळे या महिलेवर संकट कोसळले होते. स्वतःची आणि मुलाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या महिलेने मुंबई गाठली होती. मात्र, देशात कोरोना आला आणि हाताला मिळालेले काम बंद झाले. मग पुन्हा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. त्यामुळे परत मुंबई सोडली आणि उमरगा गाठले. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. दोन मुलाव्यतिरिक्त सोबत कोणीही नव्हते. त्यामुळे 14 दिवस अॅडमिट व्हायचे कसे? हा प्रश्नही होता.
आधार देण्यासाठी जवळचे कोणी सोबत नव्हते. सदर निराधार महिलेची माहिती विजय जाधव यांना मिळाली. विजय जाधव यांनी या महिलेला आधार दिला. 27 वर्षापूर्वी माझी मुलगी गेली. तुझ्या रूपाने माझी मुलगी मला परत मिळाली, असे म्हणत काळजी करू नको, असा महिलेला आधार दिला. महिलेचे 14 दिवस होतच होते, तोच महिलेच्या लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघांवर उपचार झाले. या दिवसात विजय जाधव दररोज फोन करून धीर देत होते.
उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर जायचे कुठे? असाही प्रश्न होता. यावेळी विजय जाधव यांनी स्वतःचे दोन खोल्यांचे घर या महिलेला दिले. जाधव यांच्या पत्नीने देखील या निराधार महिलेला आधार देत माझ्या मुलीप्रमाणे तुला सांभाळू, असे म्हणत स्वागत केले. कुठलंही नातं नसताना या जाधव कुटुंबीयांनी निराधार महिलेला आधार दिला.