उस्मानाबाद - स्वराज्य उभा करण्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकुर येथील तरुणाने साकारले आहे. तरुणाने गावातील शिक्षकांच्या मदतीने ग्रास पेंटिंग साकारून महापुरुषांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे.
अभयसिंह अडसूळ, असे या तरुणाचे नाव आहे. त्याला सरसेनापती हंबीरराव मोहितेंबद्दल प्रचंड आदर असल्याने त्याने शेतात ग्रास पेंटिंग काढण्याचे ठरवले. त्यानुसार ९० बाय ४५ इतक्या क्षेत्रात गहू पेरून हे चित्र साकारण्यात आले. स्वराज्याच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या वीर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ही ग्रास पेंटिंग सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. हे ग्रास पेंटिंग काढण्यासाठी कुंडलिक राक्षे आणि अक्षय पोते यांनी मदत केली आहे.
'सरसेनापती हंबीरराव मोहिते' चित्रपट -
हंबीरराव मोहिते हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांचे सरसेनापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. यंदाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.