उस्मानाबाद - तुळजापूर याथील श्री तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक पुजेची पास देणारी यंत्रणा गुरुवार पहाटे तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दिपावली सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच पास सेवा बंद पडल्याने नागरिक अस्वस्थ झाले होते. शेवटी हाताने सही करून पास वितरित करण्यात आले.
सकाळी भाविक तीन वाजल्यापासून अभिषेक पुजेसाठी प्रवेश पाससाठी वितरण रांगेत येवून थांबले होते. पहाटे ४ वाजता प्रवेश पासचे वितरण करण्यात येते. मात्र, अभिषेक प्रवेश पासेस वितरण यंत्रणा तांत्रिक कारणामुळे सुरू होत नसल्याने पास वितरण ठप्प झाले. त्यामुळे रांगेत थांबलेले भाविक अस्वस्थ झाले होते. त्यातच भाविकांची रांग वाढत सुवर्णेश्वर मंदिरापर्यत येऊन ठेपली होती. त्यानंतर गोंधळाचे वातावरण सुरू झाले. अखेर पासवर हाताने सही करून अभिषेक पुजेचे पास वितरण करण्यात आले. सध्या अयोध्या निकाल पार्श्वभूमीवर सुरक्षाबाबतीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत मंदिर प्रशासन योग्य ती दखल घेत नसल्याने मंदिर सुरक्षाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- राम जन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात शांतता बैठक