उस्मानाबाद - नगरपरिषदेत शुक्रवारी महिलांनी जोरदार गोंधळ घातला. मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी 20 नोव्हेंबरला महिलांनी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगरपरिषदेलाच कुलूप लावले.
शहरातील वासुदेव वाडी या भागात 18 नोव्हेंबरला सात वर्षीय चैत्राली सिंगनाथ या मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाला होता. या परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच चैत्रालीला डेंग्यु झाला आहे. चैत्रालीच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषदच जबाबदार असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलांनी केली. या अधिकाऱ्यांवर 302 कलमप्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, परिसराची स्वच्छता करावी, वेळेवर पाणी पुरवठा करावा, घंटागाडी दररोज पाठवावी या विविध मागण्यांसाठी हे निवेदन दिले होते.
हेही वाचा - ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनिक
महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून अधिकाऱ्यांना आत कोंडले. काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दरवाजा आतून जोरात ओढल्याने दरवाजाची कडी मोडली. यानंतर या अधिकाऱ्यांची सुटका झाली. आंदोलक महिला आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, महिलांनी आपला रुद्रावतार दाखवल्यानंतर नगरपरिषदेने मागण्या लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले.