उस्मानाबाद - रुग्णालय प्रशासनाकडून सायंकाळी फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट अवघ्या काही तासात पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. ही घटना जिल्ह्यातील कळंब येथे घडली आहे. अकरा दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात या महिलेचा समावेश होता. दरम्यान आधी जल्लोषात रुग्णालयाने निरोप दिल्यानंतर पुन्हा ही महिला कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई येथून ही महिला पतीसोबत आली होती. यावेळी हे दोघे पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्यावर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी चाचणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. याचे अहवाल येणे बाकी असतानाच, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या ( आयसीएमआर ) नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार "रुग्णाला कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी रुग्णालयातून सुटी द्या असे सांगते".
या नियमानुसार गुरुवारी घेतलेल्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच या दाम्पत्याला रुग्णालय प्रशानाकडून ठणठणीत असल्याचे सांगत शुक्रवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात त्यातील महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला. हे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले होते. दरम्यान, रुग्णाची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.