उस्मानाबाद - माळेवाडी येथे घडलेल्या कथित मारहाण प्रकरणात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सतीश दंडणाईक यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ओमराजे निंबाळकर हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - भाजप आमदारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रविवारी हिम्मतराव पाटील यांनी अकलूज येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कळंब पंचायत समिती सदस्य सतीश दंडनाईक हे माळेवाडी बोरगाव येथे गेले असता हिम्मतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दंडनाईक व गणेश भातलवंडे तसेच गाडीचालक चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरी नेले व तेथे मारहाण केली. यावेळी हिम्मतराव पाटील यांना ओमराजे निंबाळकर यांचा फोन आला.
हेही वाचा - ऑनलाईन पिकविमा भरताना अडचणी, शेतकरी हप्ता भरण्यापासून वंचित राहण्याचा धोका
त्यावेळी हिम्मतराव पाटील यांनी निंबाळकर यांना सागितले की, आम्ही सतीश दंडनाईक यांना पकडले आहे. त्यावेळी ओमराजे फोनवर ओरडून सांगत होते की, दंडनाईक यांना सोडू नका, त्याला धडा शिकवा, असे स्पीकरवर फोन असताना मी ऐकले आहे, असे दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी हिम्मतराव पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर लोकांविरुद्ध सतीश दंडनाईक यांना जिवंत मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.