उस्मानाबाद - जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. या दारू प्रकरणावर वडगाव सिद्धेश्वर येथील महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. गावातील महिलांनी दारूविक्री सुरू असलेल्या दुकानांची तोडफोड केली.
महिलांनी पुढाकार घेऊन सरपंचाला दारू विक्री बंद करण्याचे निवेदन दिले. त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तिची भेट घेऊन त्याला दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. मात्र, त्याने महिलांना अरेरावीची भाषा वापरली. या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी दारूविक्री दुकानाची तोडफोड केली. विक्रेत्याने लपवून ठेवलेली दारूही शोधून नष्ट केली.
हेही वाचा - 'यापुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अभिषेक नाही,' विश्वस्त समितीच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध
यानंतर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन दिले. एकाच वेळी असंख्य महिलांनी दारूविक्री दुकानावर छापा मारल्याने प्रचंड गर्दी झाली होती.
गावातील लोक शाळेच्या आवारात, अंगणवाडी परिसरात दारू पिऊन बसतात आणि शिवीगाळ करतात. त्यामुळे शाळेतील लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होतो. पुरूष घरातील महिलांना मारहाण देखील करतात. याच प्रकाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली. दारू विक्री अशीच सुरू राहिली, तर आत्मदहन करू, असा इशारा या महिलांनी दिला.