उस्मानाबाद - ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास 2 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांला या अतिवृष्टीचा फटका बसला. तर तब्बल 3 हजार 165 हेक्टर जमिनी खरडून गेली आहे. याशिवाय 162 जनावरे दगावली आणि 1171 घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या नैसर्सिक संकटाने शेतकऱ्यांचे तर न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. मात्र, अनेक नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना जी मदत देण्यात आली, त्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्हाला मदत देता का भीक? असा सवाल उपस्थित केला आहे.
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी-
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच नुसानकार अतिवृष्टी झाली आहे. वार्षिक सरासरी पेक्षा अधिक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्यात वाहून गेले, पिकाला जागेवरच मोड आले. दिवाळीसणापूर्वीच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशांची होळी झाली होतूी. पावसाने झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही विद्यमान मंत्र्यांनी हजेरी लावली. मात्र अद्यापही सरकारी मदतीचा एक छदामही शेतकऱ्यांच्या खिशात जमा झालेली नाही. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हेक्टरी दहा हजार रुपये आणि फळ पिकांसाठी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई घोषित केली. मात्र ही मिळणारी मदत अगदीच तुटपुंजी असून 'आम्ही काय भिकारी आहोत काय? असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे
प्रशासकीय गोंधळ अन आचारसंहितेची आडकाठी-
मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसासोबत झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी सरकारच्या मदतीविनाच जाणार आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीची आचारसंहिता, शेतीपिकांचे पंचनामे आणि त्यासाठी प्रशासकीय पातळीवर गोंधळाचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे सरकारकडून घोषित करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीतही शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची शक्यता दिसून येत नाही.