उस्मानाबाद - सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे जिल्ह्यातले २२३ धरणे कोरडीठाक पडली होती. या धरणाची पाणी साठवण क्षमता ७००.६२७ दलघमी एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात २६२.८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा सध्या आहे. पाण्याची टक्केवारी 37.51 एवढी आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पावसाने दगा दिला आणि उस्मानाबाद जिल्हा पूर्णपणे कोरडा राहिला त्यानंतर परतीच्या पावसाने अशा पल्लवित झाल्या होत्या या पावसाने खरीप पिकाचे नुकसान करून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. मात्र, तरीही या परतीच्या पावसाने समाधान कारक पाणीसाठा झालेलाच नाही. सुमारे २२३ पैकी केवळ ४६ प्रकल्पच १०० टक्के भरले आहेत.
३६ प्रकल्पांत ७५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे. तर ६ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५४ ते ५५ टक्के एवढा अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांश लहान, मोठे व मध्यम प्रकल्प तसेच साठवण तलावही कोरडेठाक होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. त्यानुसार शेवटच्या टप्प्यात परतीचा पाऊस झाला. जिल्ह्यातील मध्यम ४, लघु ४२ असे एकूण ४६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर मध्यम १ लघु ३५ अशा एकूण ३६ प्रकल्पांत ७५ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम ३, लघु १८ अशा २१ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. ३१ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर ५१ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे.