उस्मानाबाद- माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काल परंडा तालुक्यातील रोसा या गावाला भेट दिल्यानंतर आज अपसिंगा, बेडगा या गावासह अन्य गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या समोर सरसकट मदतीची मागणी केली.
संपूर्ण शिवारात ८० टक्के चिबड निर्माण झाली असून, ती घालवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्यात आम्ही अयशस्वी झालो. परतीच्या पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने सोयाबीन नासून गेले. आता आमच्याकडे रब्बीची पेरणी करण्यासाठी देखील पैसे शिल्लक नसल्याचे शेतकऱ्यांनी फडणवीस यांना सांगितले.
तसेच, जे झाले ते झाले, मात्र आता तरी सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. तरच शेतकऱ्यांना कमी ना जास्त प्रमाणात आधार मिळणार. अशी मागणी शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
हेही वाचा- मोबाईलमधून काढलेला फोटो पंचनामा म्हणून ग्राह्य धरावा - देवेंद्र फडणवीस