उस्मानाबाद - शुक्रवारी रात्री मोर्डा येथील चोरीचा आरोप झाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रंगराव अंबादास पाटील-कोळेकर (53) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटील-कोळेकर यांना गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी एक शेळी सापडली होती. ही शेळी एक महिन्यापूर्वी मुळ मालकाचा तपास लागल्यावर कोळेकर यांनी परतही दिली होती. मात्र, शेळी चोरी गेली अथवा हरवली या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे कोणाचीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नसताना, तुळजापूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गौतम शिंदे व राठोड यांनी रंगराव पाटील-कोळेकर यांना तुम्ही शेळीची चोरी केली आहे. या प्रकरणी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत धमकावत होते.
हेही वाचा - बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का मंदी..?
त्यानंतर पाटील-कोळेकर यांना हेड कॉन्स्टेबल शिंदे व राठोड यांनी पोलीस ठाण्यात हजर व्हा. अन्यथा, 10 ते 20 हजार रुपये द्या, अशी मागणी करत असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या सततच्या पैशांच्या मागणीमुळे तसेच गुन्ह्यात अडकावण्याच्या धमकीमुळे त्रासून राहत्या घरात गळफास घेऊन पाटील यांनी आत्महत्या केली.
त्यामुळे संतप्त नातलग व ग्रामस्थांनी या प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेह खाली न उतरवू देण्याचा निर्णय घेतल्याने तब्बल 19 तास मृतदेह खोलीतच लटकलेला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.
हेही वाचा - राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य वाद; साहित्य परिषद जाणार न्यायालयात