उस्मानाबाद - जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते डॉ.पद्मसिंह पाटील व राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनतर राष्ट्रवादीने प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यात डॉ पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले असल्याची टीका, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व डॉ.पदमसिंह पाटील यांचे जुने सहकारी आणि जवळचे नातेवाईक जीवन गोरे यांनी केली आहे.
काल राणा जगजितसिंह पाटील यांनी सोलापूर येथे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जीवन गोरे म्हणाले की, जिल्ह्यात पक्षाची ताकत जशी होती तशीच आहे. या दोघांनी प्रवेश केल्याने पक्षाचे काहीही नुकसान झाले नाही. नेते गेले आहेत मात्र कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्येच आहेत. त्यामुळे हे दोघे नेते आमच्या दृष्टीने किरकोळ असल्याचे व्यक्तव्य जीवन गोरे यांनी केल्याने आता दोन्ही पक्षातील कौटुंबिक वाद वाढणार असल्याचे दिसते आहे.
त्यामुळे हा वाद निवाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वतः शरद पवार हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. पुढील १५ दिवसात ते दौरा करणार असल्याची माहिती गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भूम वाशी परंडाचे विद्यमान आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.