उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा शहरातील शेंडगे हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana ) व विविध कंपनीचे इन्शुरन्स बोगस लाभार्थी (रुग्ण) दाखवून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार घडला आहे. (Crores Rupees Embezzled by Showing Bogus Beneficiaries) याप्रकरणी रुग्णालयातील लॅब टेक्निशियन बनसोडे याला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी डॉ. आर. डी शेंडेगे हा अद्याप फरार आहे. (Dr. R. D. Shendge Absconding)
तक्रारदार टेक्निशियनच सहआरोपी -
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ. आर. डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोरे याप्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ. शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती. त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे सादर करत लाखोंचे बिले हडप -
याबाबत अधिक वृत्त असे की, डॉ. शेंडगे यांनी 2015पासुन 6 सप्टेंबर 2019पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले. डॉ. शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा लॅब टेक्निशियन बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ. शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले. त्यानंतर बनसोडे व डॉ. शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला.
हेही वाचा - Warkaris Accident in Pune :पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; दोन जणांचा मृत्यू तर 30 जखमी
समितीच्या अहवालावरून डॉक्टर आणि टेक्निशियनवर गुन्हा दाखल -
बनसोडे याने डॉ. शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. समितीने याप्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्याप्रकरणी आणि रुग्ण दाखल नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्याप्रकरणी डॉ. आर. डी. शेंडगे आणि तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले. ऑक्टोबरमध्ये दोघांविरोधात डॉ. अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद करण्यात आला.
सुरुवातीचा तक्रारदार बनसोडे पोलीस कोठडीत तर मुख्य आरोपी फरार -
रुग्णांची आर्थिक फसवणूक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याप्रकरणी तत्कालीन लॅब टेक्निशियन आरोपी तानाजी बनसोडे याला उमरगा न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बनसोडे पोलिसांना शरण येत स्वतः हजर झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ. शेंडगे हे अद्याप फरार आहेत.
संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवण्याची मागणी -
शेंडगे हॉस्पिटल येथे झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशी मागणी करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, हॉस्पिटलच्या भ्रष्टाचारामध्ये डॉ. सचिन शेंडगे (एमडी) पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर डॉक्टर अब्दुल गफ्फार याचा व अन्य डॉक्टरांचा समावेश आहे. सर्वांनी मिळून महात्मा फुले जनआरोग्य योजना व विविध कंपन्याचे इन्शुरन्स बोगस लाभार्थी रुग्ण दाखवून करोडो रुपयांची अफरातफर केली आहे. त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिक उमरगा पोलिसांकडून तपास कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग करून तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाहूराज माने (विधानसभा अध्यक्ष, उमरगा-लोहारा) यांनी केली आहे.