उस्मानाबाद - जिल्ह्यातील शिवसेनेचा अंतर्गत वाद पदाधिकाऱ्यांनी केलेल्या राड्यातूनच चव्हाट्यावर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली याचिका मागे घे म्हणून उस्मानाबाद शहराचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी, शहर प्रमुखास घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी स्वत: ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
पाच कोटी रुपयाचा घोटाळा-
प्रशांत साळुंखे यांनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपण उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंर्तगत करण्यात आलेल्या कामात पाच कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र हे प्रकरण मिटवण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे असे तिघेजण गुरुवारी रात्री साडे दहा वाजता साळुंके यांच्या काकडे प्लॉटमधील राहत्या घरी येऊन बाचाबाची केली.
याचिका मागे घेण्यासाठी मारहाण-
तू हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घे म्हणून त्यांनी दमदाटी सुरू केली. यावेळी साळुंखे यांनी याचिका मागे घेणार नाही, म्हटल्यानंतर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी साळुंखे यांना मारहाण करत आश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
साळुंखे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे यांच्या विरुद्ध भादंवि ४५२, ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.