उस्मानाबाद - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यावरून चांगलेच राजकारण तापू लागले आहे. यावरून आज भाजपाने आंदोलन करत निदर्शने केली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक कायद्याला राज्य सरकारने विरोध करत या विधेयकाला स्थगिती दिली आहे. याचे पडसाद आता जिल्ह्यात उमटले असून जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थगिती आदेशाची भाजपातर्फे होळी केली. त्याचबरोबर आंदोलनावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही शांत बसणार नाही. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून दलालांना या कायद्याचा फटका बसणार आहे. मात्र, या महविकास आघाडीला शेतकरी सुखावलेला आवडत नाही. त्यामुळेच, लोकसभेत अप्रत्यक्ष पाठिंब्याने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यात विरोध केला जात आहे. लवकरात लवकर हा कायदा राज्यात लागू करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा - राज्यात कृषी कायद्याला स्थगिती देणाऱ्या निर्णयाची भाजपाकडून होळी