उस्मानाबाद- गेल्या आठ महिन्यापासून राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि संक्रमण टाळण्यासाठी राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच वेगवेगळी आस्थापना सुरू करण्यास सुरुवात झाली. परंतु मंदिर उघडली जात नसल्याने मंदिराव विसंबून असणारे व्यवसाय फारसे चालत नव्हते. त्यामुळे मंदिर उघडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि भविकांमधून होत होती. त्यानंतर मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे भाजपाने पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले.
अखेर सरकारने जाहीर केला निर्णय-
छोट्या व्यावसायिकांच्या अडचणींचा धागा पकडून भाजपने मंदिरे उघडण्यासाठीची मागणी रेटून धरली होती. मात्र तरीही मंदिरे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने धरणे आंदोलन, घंटानाद आंदोलन करत मंदिर उघडण्यासाठी जोर लावला होता, तसेच अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्यांच्या मागणीसाठी तुळजापूर येथे ठाण मांडले होते. त्यानंतर अखेर शनिवारी सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय जाहीर केला.
भाजपाच्या आंदोलनामुळेच सरकारचा निर्णय-
दिवाळी पाडव्याला मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज मंदिरे खुली होताच भाजपाने जल्लोष साजरा केला आहे. फुलांची उधळण करत हलगी वाजवून आणि पेढे वाटून हा जल्लोष साजरा केला. तुळजाभवानी मंदिराच्या समोर भाविकांना पेढे वाटले आणि फुलांचा वर्षावही केला. भाजपाने केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला मागे सरकावे लागले, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या आंदोलकांनी दिली आहे. तसेच मंदिर उघडण्याच्या निर्णयाचेही भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.