उस्मानाबाद - शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर प्रचारादरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. यात राजेनिंबाळकर किरकोळ जखमी झाले. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे गेल्यानंतर ही घटना घडली अजिंक्य टेकाळे नावाच्या गावातीलच तरुणाने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात खासदारांच्या हाताला मार लागला असून याबाबत शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याच्या कारण मलाही माहित नाही. पोलिसांनी या आरोपीला पकडून खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधावे अशी विनंती ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
पाटील-राजेनिंबाळकर वाद का? आणखी काही -
ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील हे सध्या भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर लोकसभेत पाटील ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांची लढत झाली होती. यातही एकमेकां वरती अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली होती.
हेही वाचा - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
हल्ला करणारा भाजपाचा कार्यकर्ता -
अजिंक्य टेकाळे या तरुणाने प्रचारादरम्यान आलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरती चाकूने हल्ला केला. अजिंक्य कार्यकर्ता असल्याचे पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर अजिंक्य टेकाळे यांचे फेसबूक वर भाजपच्या चिन्ह असल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. हा हल्ला नेमका कशामुळे केला ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
शिवसेनेच्या दोन गटा मुळे वादाची शक्यता -
शिवसेनेमध्ये विधानसभेचे उमेदवारीवरून दोन गट पडले आहेत. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मर्जीनुसार कैलास पाटील यांना उस्मानाबाद विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. यात निष्ठावंत असलेले शिवसैनिक अजित पिंगळे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कळंब तालुक्यामधील उमेदवार देण्यात यावा, अशी चर्चा कळंब शहरात होत होती. यामुळे कळंब उस्मानाबाद या वादातूनच कळंब येथील रहिवासी असलेले अजित पिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मात्र, यातून शिवसेनेत दोन गट पडले असल्याने यातूनही हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - मी शरद पवारांसारख फक्त बोंबलत फिरत नाही - उद्धव ठाकरे